facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नाशिक / मंदिरांची सुरक्षा रामभरोसे

मंदिरांची सुरक्षा रामभरोसे

नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी चोरट्यांची तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देवळालीगावाचे श्री म्हसोबा महाराज हे ग्रामदैवत आहे. येथे मोठी यात्री भरते. या मंदिरात दि. ४ जानेवारी रोजी चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून रोकड लांबवली. या मंदिरासमोरच एेतिहासिक दुर्गादेवी मंदिर आहे, तेथेही महिनाभरापूर्वी अशीच चोरी झाली होती. या दोन्ही मंदिरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवळालीगावातील पारावरील गणेश मंदिरात एक वर्षापूर्वी चोरी झाली होती. त्यावेळी चांदीचा मुकुट आणि रोकड चोरांनी लांबवली होती. देवळालीगावतील शनी मंदिर व साईबाबा मंदिरातही चोरीची घटना घडली होती. एकाच परिसरातील पाच मंदिरांत चोऱ्या होऊनही पोलिसांची गस्त वाढलेली नाही. तीन वर्षांपूर्वी जेलरोडच्या सायखेडारोडवरील दुर्गा मंदिरातील छताची कौले काढून चोरट्यांनी हात साफ केला होता. या घटनेच्या वर्षभर अगोदर मंदिराच्या आवारातील कालभैरव मंदिराची विटंबना करण्यात आली होती. दसक येथील शनी मंदिरातही काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती.

सीसीटीव्हींचा अभाव

नाशिकरोड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये, तसेच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी प्रलंबित आहे. बिटको, देवळालीगाव, उपनगर चौक, दत्त मंदिर चौक, जेलरोडचे शिवाजीनगर चौक, सैलानीबाबा चौकात सीसीटीव्हींची गरज आहे. ते लावल्यास चोऱ्यांना आळा बसू शकेल. सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे.

आदर्श उदाहरणे

नगरसेविका संगीता गायकवाड यांनी स्वखर्चाने काही चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. जेलरोडला नगरसेवक अशोक सातभाई यांनीही असाच उपक्रम राबवला आहे. काही नागरिकांनी आपल्या घरांवर सीसीटीव्ही बसवले आहेत. श्री अण्णानवग्रह गणपती, उपनगरचे इच्छामणी, मुक्तिधाम आदी महत्त्वाच्या मंदिरांमध्ये ट्रस्टने सीसीटीव्ही बसवले आहेत. अशा उपक्रमांमुळे चोऱ्यांवर नियंत्रण आले आहे.

बहुतांश पथदीप बंदच

देवळालीगावातील बहुतांश पथदीप बंदच आहे. चोरी झाली त्या म्हसोबा मंदिरासमोरील पथदीपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद पथदीपांचा प्रश्न प्रभाग सभेत नगरसेवकांनी गाजवला होता, तरीही पथदीप सुरू झालेले नाहीत. देवळालीगावातील पोलिस चौकी कायम बंदच असते. अशीच परिस्थिती जेलरोडच्या दोन चौक्यांचीही आहे. पोलिस चौकी सुरू करावी, रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मंदिरांच्या संख्येत वाढ

नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवरही मर्यादा आल्या आहेत. महापालिकेने अनधिकृत धर्मस्थळे हटविली असली, तरी अनेक छोट्या-मोठ्या सोसायट्या आणि खासगी जागांत मंदिरे आहेत. अनेक मंदिरांना लोखंडी ग्रीलचे दरवाजे, तसेच सुरक्षा यंत्रणाही नाही. त्याचा गैरफायदा चोरटे घेतात. सध्या थंडीमुळे लवकर सामसूम होत असल्याने भुरटे चोर सक्रिय झाले आहेत.

नाशिकरोड, जेलरोड परिसरातील मंदिरे चोरांपासून सुरक्षित नाहीत, हे वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, मंदिर व्यवस्थापनांनीही काळजी घ्यावी, तसेच नागरिकांनी सजग राहावे, तरच चोऱ्यांना आळा बसेल.

-बापूसाहेब बोराडे

वायफाय, सीसीटीव्हींचे आज लोकार्पण

नाशिकरोड ः जेलरोड येथील प्रभाग क्रमांक १८ मधील महत्त्वाच्या व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वायफाय सुविधा आणि सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ आज, शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता जेलरोडच्या राजराजेश्वरी चौकात होणार आहे. भाजपचे विशाल संगमनेरे, सचिन हांडगे यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उद्घाटन होईल. बाजीराव भागवत, सुनील आडेके, प्रा. शरद मोरे, अंबादास पगारे, जयंत नारद, सुभाष घिया, शांताराम घंटे, नीलेश सानप, राजेश आढाव, ज्ञानेश्वर आढाव, विजू लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. वायफाय सुविधेमुळे नागरिकांना लाभ मिळणार असून, सीसीटीव्हींमुळे मंदिरांना सुरक्षाकवच लाभणार आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *