facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / मुलीच्या आठवणीने आईला रडू कोसळले

मुलीच्या आठवणीने आईला रडू कोसळले

आवाज नेव्ज नेटवर्क –

कोपर्डी खटल्यात पीडित मुलीच्या आईची महत्त्वपूर्ण साक्ष व उलटतपासणी गुरुवारी पूर्ण झाली. साक्ष देत असताना मुलीची आठवण येत असल्याने आईला सतत रडू येत होते. तर मुलीची सायकल, कपडे व इतर वस्तू ओळखत असताना आईला ढसाढसा रडू कोसळले. त्यामुळे न्यायालयातील वातावरण गंभीर झाले होते. या खटल्याची पुढील सुनावणी १३ ते १८ फेब्रुवारी अशी सलग सहा दिवस होणार आहे.

या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. पीडित मुलीच्या आईची साक्ष विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नोंदविली.

‘गावातील जितेंद्र शिंदे व त्याचे दोन मित्र मुलीला त्रास देत असल्याचे मोठ्या मुलीने कॉलेजमधून आल्यानंतर १३ जुलैला पाच वाजता सांगितले. परंतु तिला आता काही बोलू नको, असेही ती मला म्हणाली होती. त्या दिवशी तिने अंड्याची भाजी करण्यास सांगितले होते. घरातील मसाला संपल्याने आजोबांच्या घरातून मसाला आणावा लागेल, असे मी म्हणाले. त्यानंतर ती सायकल घेऊन मसाला आणण्यासाठी आजोबांच्या घरी गेली होती. उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिला शोधण्यासाठी मी व माझी मोठी मुलगी जात होतो. त्याचवेळी रस्त्यावर पुतण्या व त्याचे दोन मित्र मोटारसायकलवरून जाताना दिसले. छकुली घरी आलेली नाही. तिला घरी पाठवून दे असे त्यांना सांगितले. त्यानंतर तिला शोधण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला शेतात मुलीची सायकल पडलेली होती. त्याचवेळी पप्प्या कुठे पळतोस, असा पुतण्या ओरडत असल्याचा आवाज मला आला. लिबांच्या झाडाकडे बघितले असता पप्प्या पळत होता. लिंबाच्या झाडाखाली गेले असता तेथे मुलगी जखमी अवस्थेत पडली होती. त्याचवेळी

माझी चुलत सासू तेथे येऊन तिने मुलीच्या अंगावर साडी टाकली. तिला आम्ही दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी मुलगी मयत झाल्याचे सांगितल्यानंतर मला धक्का बसला व मी बेशुद्ध पडले,’ अशी साक्ष मुलीच्या आईने नोंदविली.

साक्ष नोंदवत असताना आई सतत रडत होती. मुलीचे कपडे व तिची चप्पल पाहून मुलीचे नाव घेऊन आई ढसाढसा रडू लागली. त्यामुळे काही वेळ साक्ष थांबवून आईला पाणी देवून शांत करण्यात आले. त्यानंतर मुलीच्या इतर वस्तू दाखविण्यात आल्या. सायकल व इतर वस्तू तिने ओळखल्या. मुलीला कानातील रिंग व रंगीत रुमाल खूप आवडत होते, असे सांगून आई पुन्हा मोठ्याने रडू लागली. पदराने डोळे पुसत आईने साक्ष पूर्ण केली. तिन्ही आरोपी गावातील असल्याचे सांगून तिने आरोपींना ओळखले.

ती दिवसभर जेवली नव्हती

आरोपी शिंदेच्या वतीने अॅड. योहान मकासरे यांनी उलटतपासणी घेतली. दूरगाव येथे आमच्या मालकीचे गारवा हॉटेल असल्याने आईने सांगितले. परंतु ते हॉटेल एकाला चालविण्यासाठी दिले आहे, असे उत्तर दिले. मुलीच्या छेडछाडीची माहिती पतीला १४ जुलैला सांगितली. घरातील बाब इतरांना सांगितली नसल्याचे आईने सांगितले. सासऱ्याचा दारूचा बेकायदेशीर धंदा आहे का असा प्रश्न अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी विचारला. त्याला ‘नाही’ असे उत्तर आईने दिले. तुमच्या सासऱ्याची अवैध दारू विक्री बंद व्हावी, यासाठी गावात ग्रामसभा झाली होती का असा प्रश्न खोपडे यांनी विचारला. त्याला ‘माहित नाही,’ असे उत्तर आईने दिले. पती दोन दिवस कुठे होते, असा प्रश्न विचारल्यानंतर ते दोन दिवस शेतात कामावर गेले होते, असे सांगितले. अॅड. प्रकाश आहेर यांनी मुलगी त्या दिवशी जेवली होती काय असा प्रश्न उपस्थित केला. मुलीने दिवसभर जेवण केले नव्हते, संध्याकाळी केवळ चहा-बिस्किट घेतले होते, असे उत्तर आईने दिले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *