facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / शिवसेनेला बिल्डरांचा पुळका; आशीष शेलार

शिवसेनेला बिल्डरांचा पुळका; आशीष शेलार

लीज मालमत्तांचे मागील अनेक वर्षांपासून रखडलेले धोरण महापालिका सभागृहात मंजुर झाले असते, तर या मालमत्तांमध्ये राहणाऱ्या ८० टक्के मराठी माणसांच्या इमारतींचा पुनर्विकास झाला असता. मात्र बिल्डरांचे हित पाहणाऱ्या बालबुद्धीवाल्यांनी या धोरणावर शिमगा करून हे धोरण मंजूर केले नाही, असा आरोप भाजपचे मुंबईचे अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी शिवसेनेचे नाव न घेता पालिकेत केला.

पालिकेने रेसकोर्ससह मुंबईतील २३४ बडे भूखंडधारक आणि विविध संस्था, व्यक्ती यांना मिळून अनेक वर्षांपूर्वी सुमारे चार हजार भूखंड लीजवर दिले आहेत. त्यापैकी २३४ भूखंड आणि इतर भूखंडांचे लीज संपले आहे. त्यामुळे या भूखंडांचे नूतनीकरण करण्यासाठी पालिकेने धोरण बनवले असून सुधार समितीनंतर ते पालिका सभागृहात मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. मात्र या भूखंडांमध्ये रेसकोर्स असल्याने शिवसेनेने हे धोरण फेटाळून लावले आहे. धोरण नामंजूर करण्यात आल्याने अॅड. शेलार यांनी सेनेवर जोरदार टीका केली.

सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या सुधारमधील दोन वर्षांच्या कामगिरीच्या अहवालाचे प्रकाशन अॅड. शेलार यांच्या हस्ते गुरुवारी पालिका वार्ताहर कक्षात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चार हजार भूखंडांवर इमारती, चाळी, झोपड्या, गोडाऊन, दुकाने असून त्यामध्ये ८० टक्के मराठी माणसे राहत आहेत. धोरण मंजूर झाले असते, तर दंडात्मक कारवाई करून मराठी माणसांची घरे संरक्षित करण्याची संधी होती. पालिकेला या भूखंडांतून रेडिरेकनरने महसूल मिळाला असता, शिवाय १८ टक्के व्याज मिळणार होते. मात्र हे धोरण मंजूर न करण्यामागे बिल्डराकंडून सुपारी घेतली होती का? बिल्डरांच्या प्रकल्पांतील घरांचे भाव घसरू नयेत, यासाठी हे धोरण फेटाळून लावले का, असे सवाल अॅड. शेलार यांनी केले.

पालिकेत हिंमत दाखवावी

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती हवी असून शेलार व किरीट सोमैया यांना युती नको आहे, अशी स्थिती आहे का,’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अॅड. शेलार यांनी उत्तर देणे टाळले. हिंमत असेल, तर दोन हात करायला समोर या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. त्यावर अॅड. शेलार यांनी विधानसभा निवडणुकीत आम्ही सेनेला हिंमत दाखवली आहे. मात्र त्यांना उसने बळ घ्यावे लागते. पालिकेत त्यांनी ही हिंमत दाखवावी, असे आव्हान देत युतीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे शेलार म्हणाले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *