facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / आता प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय

आता प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय

 आवाज न्यूज नेटवर्क – 

कोल्हापूर – प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव खर्चिक आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देशातील प्रमुख ६५० टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. पासपोर्ट प्रत्येक जिल्ह्यातच आणि तेही तातडीने मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी टपाल कार्यालयांना लागणाऱ्या सुविधा तातडीने पुरवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला उपक्रम यशस्वी झाल्यानंतर सहा महिन्यात देशभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

अलिकडे परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिक्षण, नोकरी याबरोबरच पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी सततच गर्दी असते. पण देशात पासपोर्ट कार्यालयांची संख्या फार कमी असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. पासपोर्ट काढण्यासाठी तीनशे ते चारशे किलोमीटर लांब जावे लागते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला. पण हे फार खर्चिक आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय, कर्मचारी, सुविधा देण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी टपाल कार्यालयांची मदत घेण्याचे ठरले आहे.

देशात ६५० प्रमुख टपाल कार्यालये आहेत, या कार्यालयात पासपोर्टासाठी येणाऱ्या अर्जांची स्वीकारणे, छाननी, कागदपत्रांची पडताळणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील काही राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादचा समावेश आहे. या कार्यालयात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशातील सर्व प्रमुख टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पासपोर्ट काढताना सुरक्षिता अतिशय महत्त्वाची आहे, यामुळे टपाल कार्यालयांना सुविधा देताना अधिक काळजी घेण्यात येणार आहे. कमी खर्चात ही सुविधा टपाल कार्यालयात उपलब्ध करून देणे शक्य आहे, यामुळे टपाल कार्यालयावरील जबाबदारी वाढवण्यात येणार आहे.

कोल्हापूरसाठी मुळेंचा प्रयत्न

कोल्हापूरात पासपोर्ट कार्यालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी येथील टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यां​शी आपण चर्चा करणार असल्याचे सांगून मुळे म्हणाले, कोल्हापुरात लवकरात लवकर हे कार्यालय सुरू होण्यासाठी लक्ष घालणार आहे. कोल्हापुरातच प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवता येतो का याची देखील चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे, त्या तातडीने पुरवण्याची सुचना करण्यात येणार आहेत.

देशात पासपोर्ट कार्यालयांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन कार्यालये सुरू करणे खर्चिक असल्याने देशातील प्रमुख टपाल कार्यालयात ही सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी ते सुरू करण्यात आले असून येत्या सहा महिन्यात बहूतांशी टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे – ज्ञानेश्वर मुळे, सचिव, परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *