facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / एक यशस्वी लढा शौचालयासाठीचा!

एक यशस्वी लढा शौचालयासाठीचा!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कांदिवलीच्या हनुमान नगरमधील रहिवाशांना शौचालयांची सुविधा देण्यासाठी दोन वर्षापासून अक्षरशः वेठीस धरले आहे. दोन वर्षांपूर्वी येथे स्पार्क संस्थेने सार्वजनिक शौचालय बांधले. पण बांधकामांच्या निकृष्ट दर्जामुळे ‘स्पार्क’ला पालिकेने काळ्या यादीत टाकल्यानंतर या शौचालयांचे व्यवस्थापन देण्याच्या मुद्द्यावरून पालिकेने हे शौचालय सर्वसामान्यांसाठी खुले केले नाही. त्यामुळे महिलांवर रात्रीच्या अंधारात उघड्यावर विधी उरकण्याची वेळ आली होती. अखेरीस पालिकेच्या आडमुठ्या पवित्र्याला न जुमानता येथील नगरसेविका अंजता यादव यांच्या पुढाकाराने सामान्यांनी या शौचालयाचे टाळे उघडले.

‘स्पार्क’ ला काळ्या यादीत टाकल्यानंतर या सार्वजनिक शौचालयांच्या पायऱ्या बांधणीचे तसेच पाणीजोडणीचे काम अर्धवट अवस्थेत होते. पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक शौचालयांच्या व्यवस्थापनाचे काम स्थानिक लोकांनी स्थापन केलेल्या गटाला (एसबीओ) दिले जाते. या कामासाठी येथील विधवा महिलांच्या रमाई गटाने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्याचवेळी भाजपचे स्थानिक नगरसेवक सागरसिंग ठाकूर यांनी सुचवलेल्या ‘एसबीओ’ना हे काम देण्यासाठी दडपशाही सुरू झाली, असा आरोप आहे.

अंजता यांनी पुढाकार घेऊन या शौचालयाचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम पूर्ण केले. शौचालयांचे व्यवस्थापन, पाणी-विजेचे नियोजन करण्यासाठी वर्गणी काढून हे शौचालय व्यवस्थापनाची तयारी दाखवली. शौचालय खुले व्हावे यासाठी वेळोवेळी प्रभाग कार्यालयांवर महिलांनी मोर्चेही नेले. परिणामी, ५६ शौचकूप असलेल्या या शौचालयांचा वापर सामान्यांनीच खुला केला आहे. यादव यांच्या पुढाकाराने हे शौचालय सामान्यांनी खुले केले असले तरीही पालिकेने त्याचे व्यवस्थापन दिल्याचा दावा सागरसिंग यांनी केला आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मात्र अशी कोणतीही संमती सागरसिंग यांना दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर हवे…

पालिकेने हे शौचालय खुले न करणारे ठोस कारणही अद्याप दिले नाही. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी प्रभाग अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अधिक माहिती असू शकेल, असे स्पष्टीकरण दिले. तर काँग्रेसच्या नगरसेविका अंजता यादव यांना, सामान्यांना दीर्घकाळ ‘कळ’ सोसायला लावणाऱ्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, याचे उत्तर हवे आहे. पालिकेने रमाई बचत गटाचा प्रस्ताव का स्वीकारला नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *