facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / लघुग्रहाचा निरीक्षणांनी आकार निश्चित

लघुग्रहाचा निरीक्षणांनी आकार निश्चित

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या एका लघुग्रहाचा प्रत्यक्ष निरीक्षणांनी आकार निश्चित करण्याचा अभिनव प्रयोग पुण्यातील आकाश निरीक्षकांनी नुकताच यशस्वी केला. २५ डिसेंबरच्या पहाटे २२ कॅलिओप नावाच्या लघुग्रहाने सारथी तारकासमूहामधील एका फिकट ताऱ्याला काही सेकंदांसाठी झाकले. ‘इंटरनॅशनल ऑकलटेशन टायमिंग असोसिएशन’च्या (आयोटा) मार्गदर्शनाखाली पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्था, आकाशमित्र आणि ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या (सीसीएस) निरीक्षकांनी या ग्रहणाचे (पिधानाचे) निरीक्षण नोंदवून लघुग्रहाचा आकार निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सूर्यापासून ४३.५ कोटी किलोमीटर अंतरावरून लघुग्रहांच्या पट्ट्यातून फिरणारा २२ कॅलिओप १६७ किलोमीटर लांबीचा असून त्याला लायनस नावाचा एक चंद्रही आहे. जमिनीवरील सर्वांत मोठ्या टेलिस्कोपमधून पाहिल्यास हा लघुग्रह एखाद्या ताऱ्यासारखा प्रकाशमान बिंदू दिसतो. अशा लघुग्रहांचा आकार निश्चित करण्यासाठी त्यांच्याद्वारे होणाऱ्या ताऱ्यांच्या ग्रहणाचा (पिधान) आधार घ्यावा लागतो. २५ डिसेंबर २०१६च्या पहाटे सारथी तारकासमूहातील टीवायसी २४३०-०११२४-१ या ९.२ मॅग्निट्यूडच्या ताऱ्याला २२ कॅलिओप या लघुग्रहाने काही सेकंदांसाठी झाकले. या वेळी लघुग्रहाची सावली आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मार्गाने पुढे युरोपपर्यंत सरकली.

लघुग्रहाच्या सावलीच्या पट्ट्यात जाऊन पुण्यातील आकाश निरीक्षकांच्या गटांनी या अत्यंत फिकट ग्रहणाचा कालावधी नोंदवला. ‘आयोटा’चे तज्ज्ञ डॉ. पॉल मॅले यांच्या नेतृत्वाखाली ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या निरीक्षकांनी पुणे ते औरंगाबाददरम्यान आठ ठिकाणांहून व्हिडिओच्या साह्याने, तर तीन ठिकाणांहून प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने पिधानाचे निरीक्षण नोंदवले. ‘सीसीएस’च्या गटांनी पुणे ते नाशिकदरम्यान तीन ठिकाणांहून प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने, तर एका ठिकाणाहून डीएसएलआर कॅमेराच्या साह्याने पिधानाचा कालावधी नोंदविला. ‘आकाशमित्र’च्या एका गटाने सावलीच्या पट्ट्याच्या मध्यरेषेवरून या घटनेचे निरीक्षण केले.

लघुग्रहाच्या सावलीच्या पट्ट्यातून पुण्यातील निरीक्षकांनी नोंदवलेला पिधानाचा कालावधी सर्व ठिकाणी वेगळा होता. या वेगवेगळ्या कालावधीवरूनच लघुग्रहाच्या सावलीचा आणि लघुग्रहाचा आकार निश्चित करणे शक्य झाले, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.

‘हौशी निरीक्षकांना खगोल संशोधनात संधी’

हौशी आकाशनिरीक्षण म्हटल्यावर अंधाऱ्या रात्री शहरापासून दूर दुर्बिणीतून ग्रह, तारकापुंज, नेब्युला पाहणे, छायाचित्रण करणे, असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, हौशी आकाशनिरीक्षक प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होऊन खगोल संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याचे उदाहरण या पिधानाच्या निरीक्षणाने घालून दिल्याची प्रतिक्रिया नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. राज्यातील हौशी आकाशनिरीक्षण संस्थांच्या समन्वयातून येत्या काळात अशाच प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग राबवण्यासाठी आयुका आणि नेहरू तारांगणातर्फे पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *