facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / वाघाचा छाव्याशी घरोबा

वाघाचा छाव्याशी घरोबा

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने छावा या मराठा संघटनेशी छुपी युती केली आहे. नगरपालिका निवडणुकीत अपयश पदरी पडल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपला शह देण्यासाठी छावा संघटनेशी ही छुपी युती केली असल्याचे समजते.

मराठा मोर्चांना राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असताना या मूक मोर्चांसंदर्भात शिवसेनेच्या मुखपत्रात एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. मराठा समाजात याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागितली होती. या प्रकरणाची प्रतिक्रिया मराठा समाजाने नगरपालिकेच्या निवडणुकीत व्यक्त केल्याने शिवसेनेला राजकीय किंमत मोजावी लागली. तर, दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने छावा या मराठा संघटनेशी युतीची छुपी युती केली आहे. या संघटनेला पुढे करून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना कसे रोखता येईल, याचे डावपेच ठरवले जात आहेत.

‌शिवसेनेचे नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री ‌विजय शिवतारे आणि छावा संघटनेचे आबा पाटील आणि रव‌ींद्र काळे यांची १८ डिसेंबरला एक बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेशी छुपी युती करण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर २६ डिसेंबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी छावा संघटनेचे रवींद्र काळे, अप्पा कुडेकर, विनोद पाटील यांनी चर्चा केल्याचे कळते. भाजपविरोधात आक्रमक व्हा, असेही शिवसेनेच्या नेत्यांनी या छावा संघटनेच्या नेत्यांना सांगितल्याचे कळते.

मुंबईत मराठा समाजाचा ३१ जानेवारीला मोर्चा आहे. या मोर्चात छावा संघटनेचा सहभाग आहे. तेव्हा शिवसेनेकडून सर्व रसद या मोर्चाला पुरविली जाणार आहे. मोर्चामार्फत भाजपविरोधात वातावरण मुंबईत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भूमीपूजनाचा जंगी कार्यक्रम भाजपने मुंबईत केला होता. तेव्हा भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी केली होती. याची परतफेड करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून मुंबईतील मराठा मोर्चाच्या माध्यमांतून करण्यात येणार असल्याचे कळते. मराठा समाजाचे मोर्चे आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने हाताळले आहेत. त्यांच्या प्रत्येक मागणीला प्रतिसादही दिला आहे. मात्र या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर कार्यक्रमात अडचणी आणण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि भाजपला शह देण्यासाठी अशा पडदामागील हालचाली सुरू आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *