facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / समन्वयातून यशोशिखर गाठणे सोपे

समन्वयातून यशोशिखर गाठणे सोपे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – घर, कुटुंब, व्यवसाय या पातळींवर यशस्वीपणे लढत कुठलेही शिखर गाठता येणे शक्य आहे. स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला साजेसे कर्तृत्व मिळविण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखून अभ्यास, कष्ट आणि सातत्य याची जोड देऊन काम करा, यश तुमच्या हातात आहे. पण करिअर आणि घर या दोन्ही पातळ्यावर यश मिळविण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक महिलांनी शनिवारी येथे केले.
मासिआतर्फे आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ प्रदर्शनात महिला उद्योजकांचे यश या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. हावरे इंजिनिअर्स अँड बिल्डर्सच्या प्रमुख उज्ज्वला हावरे, डॉ. ज्योती दाशरथी, डॉ. रश्मी बोरीकर, मिताली मिश्रा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. नीता वाळवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पतीच्या निधनानंतर श्रीमती हावरे यांनी उभा केलेला बांधकाम व्यवसाय समर्थपणे सांभाळून नावारूपाला आणला आहे. पतीने जपलेला सामाजिक वसाही तितक्याच समर्पणाने त्यांनी जोपासला आहे. लहान मुलांची जबाबदारी पेलून त्यांनी केलेली वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठरली. स्त्रिया या मल्टी टास्क असतात. व्यवसायात यशस्वी होणे त्यांना सहजशक्य आहे, फक्त त्यांनी आपल्या क्षमता ओळखायला हव्यात, असे त्या म्हणाल्या.
डॉ. ज्योती दाशरथी यांनी त्यांच्या फूड प्रोसेसिंग उद्योगबाबत माहिती दिली. डॉ. रश्मी बोरीकर यांनी वैधकीय व्यवसाय आणि सामाजिक कार्य यांची सांगड कशी घातली याची माहिती दिली. एक्स्पर्ट ग्लोबल सोल्यूशन्समधील अभियंता, जगभर फिरणाऱ्या मिताली मिश्रा म्हणाल्या, की घर आणि काम यांची सांगड घालणे आवश्यक आहे. कष्ट करण्याची तयारी ठेवली तर कोणतीही तरुणी हे करू शकते असे त्या म्हणाल्या.
डॉ. ज्योती दाशरथी यांनी, फूड प्रॉडक्ट तयार करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन क्लस्टर तयार करावे, शासन, बँक आपल्याला मदत करण्यास तयार आहे, असे सांगितले. प्रास्ताविक विजय लेकुरवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन अभय हंचनाळ यांनी केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *