facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / साफसफाई

साफसफाई

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – शहरातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार विरोधातील गेल्या २२ वर्षांच्या नाशिककरांच्या लढाईला अखेरीस यश आले. दिवाणी न्यायालय ते सुप्रीम कोर्ट अशा संघर्षानंतर भंगार बाजारावर अखेर हातोडा पडला. महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असून, वार्षिक शंभर कोटींच्या आसपास उलाढाल असलेला बाजाराने उद्‍ध्वस्त होत आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा, ६०० कर्मचारी, पाचशे पोलिस व मोठ्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने पहिल्या दिवशी तब्बल ९४ दुकाने हटविण्यात आली असून, चार दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे.

प्रशासकीय व न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर व महापालिका प्रशासनाने राजकीय दबावही झुगारल्याचे लक्षात येताच व्यावसायिकांनी हार मानत अखेरीस शुक्रवारच्या रात्रीपासून बाजार खाली करण्यास सुरुवात केली. आयुक्त अभिषेक कृष्णा व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सर्व विरोध झुगारून कारवाईचे अस्र उगारत प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास वाढवला. भंगार बाजाराविरोधात सन १९९५ पासून सुरू असलेलेल्या प्रशासकीय, राजकीय व न्यायालयीन लढाईला यश येऊन शनिवारी सकाळी बुलडोझर चालविण्यास सुरुवात झाली. या कारवाईसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणाच रस्त्यावर उतरल्याने अंबड लिंक रोडला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे व्यावसायिकांचा किरकोळ विरोध वगळता पहिल्या दिवशी कारवाई शांततेत पार पडली. पोलिसांसह महापालिकेचे नगररचना, आरोग्य, अग्निशमन, अतिक्रमण, प्रशासन, या विभागांनी संयुक्त कारवाई करीत पहिल्या दिवशी सहा झोनपैकी दोन झोन शनिवारी उद्‍ध्वस्त केले. जवळपास शंभर कोटींची उलाढाल असलेला व गुन्हेगारांसाठी छत्र असलेला हा बाजार हटणार असल्याने नाशिककरांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला.

लाठीमार व दगडफेक

कारवाई होणार हे निश्चित होताच भंगार व्यावसायिकांनी सकाळपर्यंत जवळपास ५० टक्के भंगार बाजार खाली केला होता. काही दुकानदारांनी महिलांना पुढे करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. किरकोळ दगडफेकही झाली. काही माथेफिरू तरुणांनी शक्तिप्रदर्शन करीत विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी लाठीमार करीत लगाम घातला.

मनपा इतिहासातील तीन मोठ्या कारवाया

सन १९९१ : प्रशासकीय राजवटीत ४३ बंगले जमीनदोस्त, सन १९९९ : रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मुंबई नाका अतिक्रमण मोहीम,
७ जानेवारी २०१७ : ७४६ भंगार दुकानांवर हातोडा

अनधिकृत भंगार बाजारावर कारवाईला सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या आदेशांचे पालन करून ही कारवाई सुरू असून, पोलिस आयुक्त व प्रशासनाच्या सहकार्यामुळे ही मोठी कारवाई शक्य झाली.

– अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

नाशिककरांच्या वतीने या लढाईचे नेतृत्व करायची संधी मला मिळाली असून, ही सर्वात मोठी ऐतिहासिक कारवाई आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांचे विशेष आभार.

– दिलीप दातीर, याचिकाकर्ता

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *