facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / सामूहिक प्रयत्नांनी बहरली ‘हिरवाई’

सामूहिक प्रयत्नांनी बहरली ‘हिरवाई’

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे सातत्यपूर्ण आणि सामुहिक प्रयत्न केल्याने परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे. वनस्पतींच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती इथे असून, गावाला या वनाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. गावाने संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

इन्सीच्या दाट जंगलात सूर्य किरणांनादेखील प्रवेश कठीण असतो. विशेष म्हणजे जंगलात फिरताना एकही झाड तोडलेले दिसत नाही. ग्रामस्थांच्या गेल्या १७ वर्षाच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. ग्रामस्थांनी स्वत:हून अवैध चराईस आणि वृक्षतोडीस प्रतिबंध केला आहे. समितीचे सदस्य दोन-तीन व्यक्तींच्या गटात गस्त घालून जंगलाचे रक्षण करतात. ग्रामपंचायतीने दोन रखवालदारांची नेमणूक केली असून त्यांच्या मानधनासाठी प्रत्येक कुटुंबाकडून ठरल्याप्रमाणे निधी गोळा केला जातो.

ग्रामस्थांकडूनच काळजी

वणवा लागू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. जंगलात आगपेटी घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. वनक्षेत्रात अतिक्रमण करण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आढळल्यास समितीचे सदस्य वनविभागाला तात्काळ माहिती देतात. अवैध चराईस पूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे गवत कापून आणण्यास ग्रामस्थांना परवानगी असल्याने चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

वनतळ्यांची समृद्धी

जंगलात वन्यजिवांच्या शिकारीसदेखील बंदी करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. त्यामुळे इथे मोर, ससे, घोरपड, कोल्हे, लांडगे, बिबट आदी प्राणी-पक्षी आढळतात. जंगलात नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. त्याखेरीज विविध ठिकाणी चार वनतळे घेण्यात आली आहे. पावसाळ्यात बंधारे बांधून पाणी अडविले जाते. वृक्षांचा पालापाचोळा जंगलातच राहत असल्याने बाष्पीभवन कमी होण्याबरोबर जमिनीचा पोतही चांगला राहण्यास मदत होत आहे. वनराईमुळे जमिनीची धूप थांबून शेतातील मृदेचे रक्षण होण्यास मदत झाली आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी बी. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ग्रामस्थांशी चांगला समन्वय राखला असून गावात ३२ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. गावात सभामंडप बांधून तो भाड्याने दिला जातो. शेतकऱ्यांना दहा आंब्याची आणि एक लिंबाचे कलम शेतात लावण्यासाठी वाटप करण्यात आले आहे.

वीस वर्षापूर्वी गावाभोवती उजाड माळरान होते. आज १०६ प्रकाराच्या वनस्पतींच्या प्रजातींनी नटलेले वन गावात असल्याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला आहे.

– रमेश पवार, ग्रामस्थ

लोकामध्ये जंगलाबद्दल चांगली भावना रुजावी आणि जंगलापासून होणारे फायदे त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी वनविभागातर्फे विविध योजनांचा लाभ गावाला देण्यात आला आहे.

-शश‌िकांत वाघ, वन परिमंडळ अधिकारी

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *