facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / अहमदनगर / आधी चौकशी, नंतर गुन्हा

आधी चौकशी, नंतर गुन्हा

ग्रामपंचायतींच्या व्यवहारात अनियमितता असणे, महत्वाच्या कागदपत्रात फेरफार करणे, निधीचा अपहार करणे यासारखे गैरप्रकार घडल्यास यापुढे गुन्हा दाखल करावाच लागणार आहे. मात्र, त्याआधी या प्रकारांबाबत अन्य विभागांचे अहवाल तसेच विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले तरच संबंधित ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. या आधीच्या विनाचौकशी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशात विभागाने सुधारणा केली आहे. यात आधी गैरप्रकार सिद्ध करावा लागणार असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लांबणार आहे. मात्र, या आदेशाने ग्रामसेवक व सरपंच मंडळींना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्यास संबंधित प्रकारास जबाबदार असणाऱ्या सरपंच, ग्रामसेवकांवर कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हे दाखल केले जात होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील प्रशासकीय व विभागीय चौकशीस सुरुवात केली जात होती. गैरव्यवहार सिद्ध होण्याच्या अगोदरच अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असल्याने ग्रामसेवक संघटनांनी या धोरणास विरोध केला होता. गैरव्यवहार सिद्ध झाल्यासच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनांकडून केली जात होती. या मागणीसाठी सातत्याने आंदोलनेही केली गेली. ग्रामसेवकांच्या या मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून, पूर्वीच्या आदेशात काही सुधारणा केल्या गेल्या आहेत.
शासनाच्या नव्या आदेशानुसार ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार करणे, निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीच्या मूळ कागदपत्रांत बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हाच असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अशा गुन्ह्यांबाबत अन्य विभागांचे अहवाल व विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याचा स्पष्ट निष्कर्ष काढला गेला असल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच ज्या प्रकरणांत कोणतीही चौकशी झालेली नाही, अशा प्रकरणात संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्रथम एक महिन्याच्या आत चौकशी करावी. या चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधित दोषी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयाने गावपातळीवर काम करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गावच्या स्थानिक राजकारणातून विरोधी मंडळी नेहमी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवत असतात. यातून गैरव्यवहार व अन्य आरोपही होत होते. राजकीय सूडबुद्धीतून होणाऱ्या या प्रकाराने ग्रामपंचायतींची व गावांचीही बदनामी होत होती. मात्र, आता आरोप झाले तरी त्यात तथ्य आहे की नाही, हे तपासल्यानंतरच गुन्हे दाखल होणार असल्याने त्याचे समाधान ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *