facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नागपूर / काँग्रेसमधील ‘नाराजीनाट्य’ संपले?

काँग्रेसमधील ‘नाराजीनाट्य’ संपले?

काँग्रेसमध्ये मुलाखतीसाठी नाराजीनाट्य संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे केवळ गटाच्या उमेदवाराचा पत्ता कापू नये यासाठी की पक्षाच्या भल्यासाठी, याबाबत पक्षांतर्गत चर्चेला पेव फुटले असे असले तरी रविवारी देवडियात काँग्रेसमध्ये मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांसाठीच्या मुलाखतीचे हे वास्तव होते. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने एकाच दिवसात तब्बल १३ प्रभागांच्या मुलाखती आटोपत वेगाने कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी १२००पैकी ५५० इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेसचे शहरातील चारही दिग्गज पूर्णवेळ बसून होते. त्यामुळे एकमेकांविरुद्ध काढलेली तलवार ‘म्यान’ केली का, असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत. काँग्रेससाठी हे सुचिन्ह असून, असेच राहिल्यास निवडणुकीतील स्थिती सुधारेल असे बोलले जात आहे.

काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती रविवारपासून देवडिया भवनात सुरू झाल्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रभाग आणि २.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नागपूर जिल्हा निवड मंडळाद्वारा मुलाखती घेण्यात आल्या. यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १६,१७,३५, ३६, ३७ आणि ३८ तसेच पश्चिम नागपुरातील प्रभाग क्र. ९,१०,११, १२, १३, १४ आणि १५ या प्रभागांचा समावेश आहे. मुलाखती पक्षासाठी जिल्हयाचे पालक आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी,प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश प्रभारी रवींद्र दरेकर, सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे पाटील, अभिजित सपकाळ, चिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बंटी शेळके, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष विवेक निकोसे, अल्पसंख्यक आघाडीचे ओवेस कादरी, ब्लॉक अध्यक्ष घनश्याम भांगे, जुगलकिशोर कमनानी, पंकज निघोट, किशोर मेंघरे, पंकज थोरात, ओबीसी सेलचे चंद्रकांत हिंगे आदींचा समावेश होता.
इच्छुक उमेदवारांना प्रभागनिहाय ध्वनिक्षेपकावरून बोलाविण्याची जबाबदारी प्रभारी कार्यवाहकव सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार व संघटन सचिव अॅड. अशोक यावले यांनी पार पाडली. त्यांना उपाध्यक्ष डॉ. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, संदेश सिंगलकर, सुभाष बांगडे, अतिक कुरैशी यांनी सहकार्य केले. रविवारी अनेक दिग्गजांसोबत विद्यमान नगरसेवक व नगरसेविकांनी मुलाखती ​दिल्या.

आज पूर्व व मध्य नागपूरच्या मुलाखती

सोमवार, ९ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात येणारे प्रभाग क्र. ८, १८, १९, २०, २२ येथील मुलाखती होतील. दुपारी २ ते रात्री ८ पर्यत पुर्व नागपूर मतदारसंघातील प्रभाग क्र. २१, २३, २४, २५, २६ आणि २७ या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे अर्जवाटप बुधवारपासून

शिवसेनेतर्फे आगामी महापालिका निवडणुकीकरिता बुधवार, ११ जानेवारीपासून अर्जवाटप केले जाणार आहे. शिवसेनेच्या रेशीमबाग येथील कार्यालयातून दुपारी १२ ते ३ या वेळात इच्छुकांना अर्ज नेता येतील. अर्जदारासाठी शिवसेनेचा प्राथमिक सदस्य असणे अनिवार्य असून, ज्यांनी उमेदवारीकरिता यापूर्वी मुलाखती दिल्या आहेत त्यांनाही अर्ज भरून सादर करणे बंधनकारक राहील अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी दिली.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *