facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / जळगाव / शेंदुर्णी परिसरातील भाविकांवर काळाचा घाला

शेंदुर्णी परिसरातील भाविकांवर काळाचा घाला

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. येथील प्रसिद्ध भैरवनाथ यात्रेत नवस फेडण्यासाठी जात असलेल्या शेंदूर्णी येथील भाविकांचा टेम्पो उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून पाचोरा-जामनेर रस्त्यावर वरखेडी-आंबेवडगाव दरम्यान रविवारी (दि. ८) सकाळी १० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात इतर ५० भाविक देखील जखमी झाले आहेत. त्यात महिलांची व लहान मुलांची संख्या अधिक आहे. अपघातानंतर जखमी तसेच त्यांच्यासोबत असलेल्यांच्या आक्रोशाने मोठा हाहाकार माजला होता. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ देवाची यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कबूल केलेला नवस फेडण्यासाठी दुरदुरचे भाविक रविवारचा दिवस पाहून येथे येत असतात. शेंदूर्णी येथील शालिग्राम तुकाराम बारी हे आपल्या नातवाच्या नवसानिमीत्त टेम्पो (क्र. एम.एच. १९ एस. ५०३०) ने आपल्या जळगाव, बऱ्हाणपूर, सोयगाव व शेंदुर्णी येथील ५० ते ६० नातेवाईकांना घेऊन भैरवनाथ यात्रेस येत होते. या दरम्यान पाचोरा-जामनेर रस्त्यावर आंबेवडगाव जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व टेम्पो रस्त्याच्या खाली उतरून बाजूला असलेल्या खदानीत उलटला. त्यात रतन शिवलाल बारी (वय ५१), मंगलाबाई रतीलाल बारी (वय ५०) व कडूबा दामु लोहार (वय ६५) सर्व रा. शेंदूर्णी या तिघांचा मृत्यू झाला. टेम्पोत ५० ते ६० भविक असल्याचे समजते. टेम्पोचा चालक अमोल अरूण माळी हा गंभीर जखमी झाला असून त्याला व टेम्पोतील इतर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी चालका विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघाता स्थळाहून जखमींना जळगाव, पाचोरा येथील रुग्णालयात हलविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच सर्वधर्मियांनी धावपळ तसेच सर्वातोपरी प्रयत्न केल्याने घटनास्थळी माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. या घटनेनंतर राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेतील जखमींची भेट घेत परिस्थिती जाणून घेतली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *