facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / स्थायी समितीमुळे निधीचे ‘एक्स्टेंशन’

स्थायी समितीमुळे निधीचे ‘एक्स्टेंशन’

 राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांचा. स्थायी समितीची धुरा असल्याने प्रभागातील कामे करून घेण्यासाठी लागणार निधी मिळविण्यात त्यांना फायदा झाला आहे. आपल्याच प्रभागात जास्त निधी वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. पण, ओपन स्पेसची जास्त संख्या असलेल्या या प्रभागात नवी आधुनिक उद्याने तसेच विरंगुळा केंद्र होण्याला सर्वांत मोठी संधी आहे. येत्या चार वर्षांत ही कामे होतील, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग उच्चभ्रू वस्तीचा. अपार्टमेंट्स आलीशान बंगले यामुळे शहरातील निवडक उच्चभ्रू प्रभागांमध्ये या प्रभागाचा समावेश होतो. प्रभागात एकही झोपडपट्टी नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारे प्रश्न या प्रभागात नाहीत. उद्योजक, राजकारणी यांचे बंगले येथे मोठ्या प्रमाणात असल्याने एखाद्या समस्येसाठी कोणी नगरसेवेकाचे दार ठोठावत नाही. त्यामुळे इतर प्रभागांसाठी या प्रभागाची स्थिती नाही. त्यातच नगरसेवक मुरलीधर जाधव यांना पहिल्याच वर्षी स्थायी समिती सभापतिपद मिळाले. त्याचा या प्रभागाला फायदा झालेला दिसतो. शहरातील हायक्लास परिसरात वॉटर गटर मीटरच्या पलिकडे सुविधांची मागणी असते. तेथे मॉर्निंग वॉकसाठी एखादे गार्डन हवे असते. स्वीमिंग पूल हवा असतो. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी बॅडमिंटन कोर्ट, अशा मागण्या असतात. यातील जवळपास सर्व गरज किंवा मागण्या या प्रभागात पूर्णत्वास येत आहेत.

राजर्षी शाहू जलरण तलावाशेजारी असलेल्या अडीच एकर जागेत एक आयडीयल उद्यान उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ८० ते ९० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, पालिकेकडून तीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने एक कोटी रुपये निधी दिलेल्या बॅटमिंटन कोर्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तलावाशेजारील नियोजित उद्यानाच्या समोरच हे कोर्ट होत असून, त्याला पालिकेकडून २० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्याचे उदघाटन होईल.

प्रभागात पालिकेची व्यायामशाळा नाही. एकूण तीन उद्याने असून, त्यातील १५व्या गल्लीतील उद्यान सुस्थितीत आहे. आठव्या गल्लीतील उद्यानाचे काम सुरू असून, दहाव्या गल्लीतील उद्यानासाठी निधीची प्रतीक्षा आहे. ही तिन्ही उद्याने चांगली झाल्यास हा प्रभाग चांगल्या उद्यानांचा प्रभाग म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.

रस्त्यांची कामे नेमकी कोणाची?

नगरसेवक आणि पालिकेच्या स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी रस्ते गटर आणि विजेचे दिवे यांसाठी पालिकेतून एक कोटी रुपयांची निधी मिळविल्याची माहिती दिली. जाधव यांनी आपल्याच प्रभागात सर्वाधिक निधी खेचल्याचा आरोप पालिकेत झाला होता. त्याचवेळी प्रभागातील भाजपचे पराभूत उमेदवार विजय जाधव यांनी रस्त्यांची कामे निवडणुकीपूर्वीच सत्तेत नसताना चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून करून घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा रस्ते नेमके केले कोणी? याचे श्रेय नेमके कोणाला?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बस, आठवडा बाजार सुरू

राजारामपुरीचा विस्तारीत परिसरत असला तरी, एक्स्टेंशन परिसरातून केएमटीची एकही बस जात नसल्याने गैरसोय होत होती. बससाठी नागरिकांना राजारामपुरीत एक दीड किलोमीटर चालत विजय बेकरी किंवा माऊली पुतळ्याजवळ यावे लागत होते. अन्यथा रिक्षासाठी पैसे खर्च करावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन या परिसरातून बसस्टॉपसह एक नवीन रूट सुरू करण्यात आला आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्याचबरोबर परिसरात मंडई नसल्याने महिलांची गैरसोय होत होती. त्यापार्श्वभूमी प्रभागात आठवडीबाजार सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी दुपारी चार ते रात्री आठ हा बाजार भरतो. शेतकऱ्यांकडून थेट माल मिळत असल्याने ग्राहकही खूष आहेत.

प्रभागातील रस्ते, गटर, विजेचे दिवे ही कामे गेल्या वर्षभरात मार्गी लावली आहेत. सध्या प्रभागातील दोन उद्यानांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जलतरण तलावाशेजारी उद्यान कोल्हापुरातील सर्वांत चांगले उद्यान होईल, याची खात्री आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे हौशी आणि व्यवसायिक बॅडमिंटनपटूंची तेथे सोय होणार आहे.

– मुरलीधर जाधव, नगरसेवक

परिसरात गेली अनेक वर्षे रस्ता नव्हता. रस्त्यांना साइड कॉँक्रिट पट्ट्याही केल्या आहेत. त्यामुळे रस्ता झाल्याने आम्ही समाधानी आहोत. त्याचबरोबर घंटागाडी रेग्युलर झाली आहे. भागात काही ठराविक दिवसांनंतर धूर फवारणीही होते. आम्हा महिलांसाठी मंडईचा प्रश्न होता. पण, आठवडा बाजारामुळे तोही आता मिटला आहे.

– दीपालक्ष्मी पाटील, नागरिक

राजारामपुरी एक्स्टेंशन हा प्रभाग असा आहे, की जेथे सर्वाधिक ओपन स्पेस आहेत. त्यामुळे तेथे शहरातील सर्वांत मोठी डेव्हलपमेंट होणे अपेक्षित होते. गेल्या वर्षभरात तसे काही झाले आहे असे मला वाटत नाही. मुळात निवडणुकी पूर्वी सत्तेत नसतानाही आम्ही रस्त्यांची कामे करून घेतली होती. त्या निवडून आलेल्या नगरसेवकांना करण्यासाठी म्हणून फार थोडी कामे राहिली. बॅडमिंटन हॉलचे काम पूर्वी मंजूर झाले आहे. निवडणुकीपूर्वीच प्रभागात ३१ लाखांची कामे करून घेतली होती. सत्तेत नसलो तरीही आगामी काळात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निधी आणि केएसबीपीच्या माध्यमातून प्रभागात काही कामे करून घेण्याचे माझे नियोजन सुरू आहे.

– विजय जाधव, पराभूत उमेदवार

प्रभागात उल्लेखनीय असे काही काम झाले आहे असे मला वाटत नाही. मुळात परिसरातील बरीच कामे निवडणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झाली होती. हा प्रभाग उतरणीचा असल्याने पावसाळ्यात सायबर परिसरातून येणाऱ्या पाण्याचा निचरा नीट होणे गरजेचे आहे. त्यासाठी नाल्यांची स्वच्छता आणि बांधीव गटर व्हायला हवीत. स्विमिंग टँक शेजारील बागेत मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणे अपेक्षित होते. तसे झालेले नाही. प्रभागात स्वच्छता आणि धूर फवारणी वेळच्या वेळी होत आहे.

– प्रसाद अथणे, नागरिक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *