facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नागपूर / आणखी ‘मोबाइल डेंटल व्हॅन’

आणखी ‘मोबाइल डेंटल व्हॅन’

दुर्गम भागातील दंतरुग्णांना सेवा मिळावी, यासाठी शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आणखी एक ‘मोबाइल डेंटल व्हॅन’ मिळणार आहे. कॉँग्रेसचे तत्कालीन खासदार अविनाश पांडे यांनी यासाठी २६ लाख रुपये मंजूर केले. त्यानंतर दंत प्रशासनाने टेंडर काढले. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, तांत्रिक प्रक्रिया लवकरच पार पडून फेबु्रवारी २०१७ अखेरीस शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ही दुसरी अत्याधुनिक व्हॅन दाखल होणार आहे.

दंत रुग्णालय हे विदर्भातील एकमेव असून, या रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आदी राज्यांतूनही हजारोंच्या संख्येने दंतरुग्ण उपचारासाठी येतात. सध्या रुग्णालयात एकच मोबाइल डेंटल व्हॅन आहे. ही व्हॅन २००८ मध्ये सेवेत दाखल झाली होती. तंबाखू, खर्रा, दारू, गुटखा, सिगारेटमुळे दातांचे आजार बळावतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही खर्रा व व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्ण दंत आजाराने ग्रस्त आहेत. शासनाची रुग्णसेवा ग्रामीण भागात दारोदारी पोहोचावी यासाठी दंत रुग्णालय राज्यातील अंबेजोगाईसह इतर दुर्गम भागातही शिबिरांसाठी ही व्हॅन पाठवते.

नागपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांसह आतापर्यंत शेकडो दंत शिबिरे घेऊन ‘मोबाइल डेंटल व्हॅन’द्वारे सेवा देण्यात आली आहे. तत्कालीन खासदार पांडे यांनी आणखी एका ‘मोबाइल डेंटल व्हॅन’साठी ६ महिन्यांपूर्वी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर दंत प्रशासनाने निविदा काढली. पण, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २९ डिसेंबर २०१६ ला रिटेंडर काढण्यात आले. पांडे यांचा निधी असला तरी प्रशासकीय मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. व्हॅन खरेदीची ५० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, तांत्रिक बाबीची पूर्तता वैद्यकीय संशोधन विभाग करणार आहे. विभागाकडून पत्र येताच दंतचा एक अधिकारी मुंबईला जाऊन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. व्हॅन ताबडतोब मिळण्यासाठी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे व प्रकल्पप्रमुख डॉ. वैभव कारेमोरे परिश्रम घेत आहेत.

दोन खुर्च्या अन् वातानुकूलित

२६ लाख रुपये किंमतीतून तयार होणारी ही डेंटल व्हॅन दोन खुर्च्यांची असून, ती वातानुकूलित राहील. भारतीय दंत परिषदेच्या मानकाप्रमाणे या व्हॅनची बनावट राहील. या व्हॅनमध्ये जनरेटर व पब्लिक हेल्प सिस्टीमसुद्धा राहणार आहे.

वाहनचालकाचा प्रश्न भेडसावणार!

सध्या असलेल्या‘व्हॅनमध्ये स्वतंत्र पूर्णवेळ वाहनचालक नसून, चतुर्थश्रेणीचा कर्मचारी वाहन चालवितो आहे. (त्याच्याकडे वाहन परवाना आहे) पण, दुसरी व्हॅन आल्यास तेथेही पूर्णवेळ वाहनचालक राहणार नाही. कारण, वैद्यकीय संशोधन विभागाकडून वाहनचालकाचे पदच मंजूर नाही. त्यामुळे प्रशासन वाहनचालकाची कशीतरी ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करून रुग्णसेवा देत आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *