facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदीनंतर शहीद झालेल्यांचा आकडा जाहीर करा!: शिवसेना

नोटाबंदीनंतर शहीद झालेल्यांचा आकडा जाहीर करा!: शिवसेना

मोदी सरकारच्या नोटाबंदीला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आपल्या हल्ल्याची धार अधिकच तीव्र केली आहे. नोटाबंदीनंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ६० टक्क्यांनी घटल्याच्या दाव्याचा जोरदार समाचार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून घेतला आहे. ‘नोटाबंदीनंतर शहीद झालेल्या सैनिकांचा खरा आकडा जाहीर करा,’ असं आव्हानच ठाकरे यांनी मोदी सरकारला दिलं आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ६०-७० टक्क्यांनी घटला असल्याची माहिती लष्करानं दिली आहे. मात्र, शिवसेनेला लष्कराचा हा दावा मुळीच मान्य नाही. ‘नोटाबंदीमुळे पाकिस्तान्यांची मस्ती कमी झालेली नाही, उलट त्यांची कारस्थाने सुरूच आहेत, असं सांगतानाच, ‘लष्करानं राज्यकर्त्यांची चमचेगिरी करू नये,’ असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:

> नोटाबंदीच्या निर्णयानंतर कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद वगैरे ६०-७० टक्क्यांनी घटला असल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली, पण पुढच्या चोवीस तासांत जम्मू-कश्मीरमधील अखनूर क्षेत्रात मोठा दहशतवादी हल्ला झाला व त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

> दहशतवादी पूर्वी सार्वजनिक ठिकाणी हल्ले करीत होते. आता ते सरळ आमच्या लष्करी तळांवर हल्ले करतात व त्यात आमचे जवान मारले जातात. नोटाबंदीनंतर झालेला हा बदल मानावा काय?

> ‘नोटाबंदी’ झाल्यामुळे जे फायदे होतील त्यात दहशतवादाचे समूळ उच्चाटन हे कलम अग्रभागी होते व ते महत्त्वाचेच आहे; पण ८ नोव्हेंबरनंतर मणिपूरसारख्या राज्यात दहशतवादी घटना वाढल्या व तेथेही लष्करी तळांवर हल्ले झाले.

> गेल्या वर्षभरात पाकिस्तान्यांच्या हल्ल्यात जम्मू-कश्मीरमध्ये ६० जवान शहीद झाले आहेत. २०१४ आणि २०१५ या वर्षांत हीच संख्या अनुक्रमे ३२ आणि ३३ होती. ती यंदा दुप्पट झाली, हे पाकिस्तानला जरब बसल्याचे लक्षण कसे मानता येईल?

> नोव्हेंबर महिन्यातही नगरोटा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात आपले सात जवान शहीद झाले होते. तरीही ‘नोटाबंदी’चे परिणाम पाकपुरस्कृत दहशतवादावर होत आहेत असे मान्य केले तर मग हाच परिणाम चीनच्या दादागिरीवर आणि त्यांच्या अरुणाचल, लेह, लडाखमधील घुसखोरीवर का होऊ नये? याचेही उत्तर आमच्या लष्करी प्रवक्त्यांनी द्यायला हवे.

> लष्करावर राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याची आमची इच्छा नाही. किंबहुना त्या चिखलात कुणी त्यांना ओढू नये, पण स्वतः लष्कराने या घाणीचे शिंतोडे आपल्या वर्दीवर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. राजकारणी व सत्ताधारी त्यांच्या मतलबासाठी लष्करास राजकीय डबक्यात ओढत असतील तर लष्कराच्या सर्वोच्च प्रमुखांनी सावधान राहायला हवे. अन्यथा लष्कराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल.

> ‘नोटाबंदी’चे फायदे-तोटे काय ते येणाऱ्या काळात दिसेल, पण नोटाबंदी हा राष्ट्रीय कमी पण राजकीय विषय जास्त असल्याने त्या चिखलात दगड मारून लष्कराने स्वतःचे हसे करून घेऊ नये. ‘नोटाबंदी’नंतरही शहीद झालेल्या सैनिकांचा खरा आकडा जाहीर करावा व त्यात कालच्या तीन शहीद जवानांची भर टाकून ‘नोटाबंदी’च्या राजकारणास मूठमाती द्यावी इतकेच आमचे सांगणे आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *