facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / जळगाव / ‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा आरोप करीत जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. सोमवारी (दि. ९) नोटाबंदीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या विविध त्रासदायक धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजीदेखील केली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सकाळी अकरा वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकण्यात आलेल्या मंडपात धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी खासदार ईश्वरलाल जैन, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, वाय. एस. महाजन, सचिन पाटील, कल्पना पाटील, कल्पिता पाटील यांच्यासह तालुका व महानगर कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या वेळी त्यांच्याकडून सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करित नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधदेखील नोंदविण्यात आला. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

भुसावळला निषेध

भुसावळ : येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, मोहन निकम, पोपटराव पाटील, नाना पवार, दिलीप सुरवाडे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

सामान्यांची फसवणूक

चाळीसगाव : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी (दि. ९) तालुका अध्यक्ष दिनेश पाटील व जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नोटबंदीच्या निर्णयाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षाचे दुष्काळी अनुदानही मिळालेले नाही. फक्त भुलथापा देऊन लबाड सरकारकडून सामान्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला. ‘शेतकरी विरोधी सरकारचं करायच काय, खाली डोक वरती पाय’, ‘अडाणी, अंबानी तुपाशी, शेतकरी आमचा उपाशी’, ‘विहरी गाय गोठ्याचे झाले काय, आमदार तहसीलदार हाय हाय’, ‘शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो’, अशा घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून उठले होते. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत सांळुखे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश राजपूत, छाया महाले, भगवान राजपूत, रतन सांळुखे, प्रदीप देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तहसीलसमोर धरणे

धुळे : साक्री तालुक्यात काँग्रेस पक्षातर्फे शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डी. एस. अहिरे, तालुकाध्यक्ष दिलीप काकुस्ते, प्रदीप नांद्रे, रोशन पिंजारी, ताराबाई बहिरम, निर्मला काकुस्ते, रिना कुंवर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रावेरला एल्गार

रावेर : सोमवारी (दि. ९) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार घोषणाबाजी करत नोटाबंदी विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अरुण पाटील, सोपान पाटील, रमेश पाटील, दीपक पाटील, रमेश महाजन सहभागी झाले. निवासी नायब तहसीलदार सी. एच. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

धुळ्यात आंदोलन

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तर जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे यांना नोटबंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, उमेर अन्सारी, जयश्री अहिरराव, किरण शिंदे सहभागी होते.

बंद एटीएमची अंत्ययात्रा

धुळे : शिंदखेडा तालुक्यात जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी प्रतिकात्मक बंद एटीएम मशिन तयार करून त्याची अंत्ययात्रा काढत तहसील कार्यालयासमोर ते जाळण्यात आले. शिंदखेड्यातील हे आंदोलन जिल्हाभरात लक्षणीय ठरले. या आंदोलनात माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, सत्यजित सिसोदे, ज्योती पावरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *