facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / पालिकेच्या दंगलीत दिग्गजांना धक्के

पालिकेच्या दंगलीत दिग्गजांना धक्के

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या विदर्भातील ७ नगर परिषदांवर भाजपने झेंडा फडकवला मात्र चार ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत, आमदार आशीष देशमुख यांच्या काटोलमध्ये भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले. गोंदियात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सद्दी मतदारांनी संपविली. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने फारसा प्रभाव पाडू शकले नाही. वेगळ्या विदर्भाच्या नावावर निवडणूक लढविणाऱ्या ‘विदर्भ माझा’ पक्षाने काटोलमध्ये यश प्राप्त केले.

विदर्भातील निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेकडे असलेला रामटेकचा गड भाजपने ​खेचून आणला. काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांची संख्या वाढली पण, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठीत पक्षाला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. कामठीत साहझहा शफाक अन्सारी यांनी भाजपचे अजय कदम यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनाही काटोल आणि नरखेड राखता आले नाही. विदर्भ माझाचे खाते उघडत चरणसिंग ठाकूर यांनी काटोलच्या नगराध्यक्षपदी वैशाली ठाकूर यांना निवडून आणले. विदर्भ माझाची ही मुसंडी विदर्भवाद्यांचा उत्साह वाढविणारा आहे. नरखेडमध्ये नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली.

रामटेकवरील भगवा कायम असला तरी तो यावेळी शिवसेनेचा न राहता भाजपचा आहे. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासाठी रामटेकचा गड सर करणे मोठे यश मानले जाते. उमरेडमध्ये काँग्रेसला सुरूंग लावण्यात भाजपला पहिल्यांदाच यश आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा प्रभाव असलेल्या या नगर परिषदेवर भाजपचा डोळा होता. निवडणुकीपूर्वी खेळलेली खेळी कामात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा चार दिवसांचा दौरा, ठिकठिकाणी जाहीर सभा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांनी भाजपच्या जागा वाढल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंधरवड्यापासून ग्रामीण भागात ठाण मांडले व चार दिवस कामठीवर लक्ष केंद्रित केले. परंतु, त्यांचे कोणतेही डावपेच कामात आले नाही. गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी अनुक्रमे अशोक इंगळे व सोनाली देशपांडे यांच्या विजयामुळे भाजपला जिल्ह्यात नव्याने वर्चस्व प्रस्थापित करता आले. तिरोड्यात राष्ट्रवादीच्या नऊ आणि भाजपच्या पाच जागा आल्या मात्र, या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसला.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *