facebook
Friday , March 24 2017
Breaking News
Home / Featured / साखर आयातीची घाई करू नये

साखर आयातीची घाई करू नये

आवाज न्यूज नेटवर्क – 

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी साखरेच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. शून्य टक्के आयात कराने परदेशी मार्केटमधून साखर खरेदीच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर, केंद्र सरकारचा साखर आयातीचा निर्णय देशातील ५५० साखर कारखाने व कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक असेल, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली.

दरम्यान, २०१७-१८ चा गळीत हंगाम अतिरिक्त ऊस व साखर उत्पादनाचा होणार असल्याने दर कोसळण्याचे संकट कायम आहे. साखर दराच्या चढउतारामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक अडचणीत सापडला आहे. या उद्योगासमोरील अडचणी मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नुकतेच केद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटले. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व अन्य पदाधिकारी यामध्ये होते. शरद पवार व वळसे पाटील यांनी देशातील साखर उद्योग तसेच ऊस उत्पादक सध्या कसे अडचणीत सापडले आहेत, हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले व यातून मार्ग काढण्याची विनंती केली.

याबाबत मटाशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून काही दिवसांपासून साखर आयात करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. या खरेदीसाठी आयात कर शून्य टक्के असेल या केंद्र सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रासह देशातील ५५० साखर कारखाने व कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा निर्णय मारक ठरणार आहे. ते म्हणाले, वास्तविक पाहता, साखर तयार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. आणि काही महिन्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने साखर कारखान्यांना साखर विक्री करावी लागली. ऊस उत्पादकांना अधिकचे दोन पैसे मिळण्याची संधी व घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली असताना केंद्र सरकार साखर आयात करायला निघाले आहे. साखर आयात झाल्यावर स्थानिक बाजारात साखरेचे दर कुत्रिमरीत्या कोसळतील व ते देशातील साखर उद्योगाला, शेतकऱ्यांना धोकादायक असेल, अशी भीती वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

साखर साठवू नका

सद्य स्थितीत राज्यासह देशातील सर्वच ५५० साखर कारखान्यांनी साखरेचे साठे करून ठेवू नयेत. उलट साखरेची विक्री वाढवून स्थानिक बाजारात साखरेचे किरकोळ दर आटोक्यात कसे राहतील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

चौकट ः

दर कोसळण्याची भीती

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धरण साठे भरलेले आहेत. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढल्याने पाण्याची स्थिती चांगली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षाचा २०१७-१८ च्या गळीत हंगामात देशात अतिरिक्त ऊस व साखर उत्पादन होईल, अशी स्थिती होणार आहे. अतिरिक्त साखर उत्पादनाचा फटका बसून साखरेचे दर पुढील हंगामातही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयातीची घाई करू नये; अन्यथा, देशातील साखर उद्योग आणखी संकटात सापडेल आणि ऊस पिकविणारे कोट्यवधी शेतकरी अडचणीत येतील, असा इशारा वळसे पाटील यांनी केंद्र सरकारला दिला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *