facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / ‘सेल्फी’वर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

‘सेल्फी’वर शिक्षक संघटनांचा बहिष्कार

राज्य सरकारच्या सेल्फी कार्यक्रमावर सोमवारी बहुतांश शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. औरंगाबाद जिल्ह्यातील ४,१९० शाळांपैकी सायंकाळी उशिरापर्यंत १,१८० शाळांमधील शिक्षकांनी सेल्फी काढून जिल्हा परिषदेकडे पाठविल्या.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून दैनंदिन विद्यार्थी हजेरी व विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याबाबत सूचित केले होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही याची सक्ती केली गेली. प्रत्यक्षात अनेक शाळांचा वीजपुरवठा कित्येक महिन्यांपासून खंडित केला आहे. त्याबाबत काहीच निर्णय झालेला असताना अशा प्रकारचे आदेश देऊन शिक्षकांची अडवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये मोबाइलला नेट उपलब्ध होत नाही. प्राथमिक शिक्षक संघाने यापूर्वी सरकारच्या विविध उपक्रमांना पाठिंबा देत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. मात्र, या उपक्रमामुळे अडचणी निर्माण होणार असल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जालिंदर चव्हाण, रमेश गिरी आदींनी निवेदनाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने प्रधानसचिव नंदकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सेल्फी काढण्यात गेला दिवस
शनिवारी उपस्थिती व सेल्फीचे अँड्रॉइड अॅप प्रशिक्षण घेतल्यानंतर मुख्याध्यापकांनी रविवारी दिवसभर आपली शाळा, शिक्षक, त्यांचे वर्ग, शालार्थ आयडी, अँड्रॉइड अॅपला संलग्न केले. सोमवारी शिक्षकांची कसोटी सुरू झाली. सेल्फी काढण्यात अनेक शाळांमध्ये दिवस गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही. गटागटाने सेल्फी काढून शिक्षकांनी तो सबमिट केला. सेल्फी काढणे आणि अपलोड करण्यात राज्यभरातील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे लाखो तास वाया जाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, दत्तात्रय गायकवाड, राजेश भुसारी यांनी कळविले आहे.

धुरा मुख्याध्यापकांवर
महापालिका शाळेतील सुमारे दहा टक्के शिक्षकांकडे अँडरॉइड फोन नसल्यामुळे सेल्फीची भिस्त त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर आली आहे. पहिल्याच दिवशी अॅप डाऊनलोड करून त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यातच शिक्षकांचा वेळ गेला. सलग पाच सोमवार सरल प्रणालीच्या माध्यमातून सेल्फी पाठवावा लागणार आहे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. सर्वशिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. आज सर्व ७७ शाळांमधून हा उपक्रम राबवण्यात आला.
सेल्फीचा आजचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे काही ठिकाणी अडचणी आल्या. त्रुटीही निघाल्या. काही शिक्षकांकडे अँडरॉइड फोन नाहीत हे लक्षात आले. पुढच्या सोमवारपर्यंत सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. – रवींद्र निकम, उपायुक्त, महापालिका

सेल्फी काढून अपलोड करण्याला विरोध आहे. पहिल्याच दिवशी अॅपमध्येही अडचणी आल्या. नेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने शिक्षक दिवसभर याच कामात व्यस्त होते.- संतोष काटे, राज्य संपर्क प्रमुख, शिक्षक भारती

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *