facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / नागपूर / गुन्हेगाराला पक्ष नसतो, सोडणार नाही!

गुन्हेगाराला पक्ष नसतो, सोडणार नाही!

‘गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, गय केली जाणार नाही,’ असा इशारा नागपूर ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांच्याकडून बलकवडे यांनी मंगळवारी सायंकाळी कारभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपला ‘अॅक्शन प्लॅन’ सादर केला.

जिल्ह्यातील गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यांनुसार, गुन्हेगारांची वर्गवारी करण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर दाखल गुन्ह्यांनुसार त्यांच्याविरुद्ध तडीपार, एमपीडीए व मोक्काची कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा आकडा वाढविण्यावर भर नसून, गुन्हे नियंत्रणात आणण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच स्वतः गुन्हेगारांची कुंडली तयार करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना ‘प्रो अॅक्टिव्ह’ करणे हा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील वाळूमाफियांचीही गय केली जाणार नाही. कोणा-कोणाचा तस्करीत समावेश आहे,त्यांच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत, याची यादीतच प्रत्येक पोलिस स्टेशनला काढायला सांगण्यात आली आहे. आठवडी बाजारात खंडणी मागणाऱ्यांना थेट कोठडीत डांबण्यात येईल. त्यांचीही यादी तयार करण्यात येत आहे.

२०१० तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले बलकवडे यांनी अमरावती ग्रामीण येथून कार्याला सुरुवात केली. औरंगाबाद येथील कन्नड व सिल्लोड तसेच अहमदनगर येथे ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते. त्यानंतर ते नागपुरात पोलिस मुख्यालय व परिमंडळ क्रमांक एकचे पोलिस उपायुक्त होते. उपायुक्त असताना त्यांनी सर्वाधिक तडीपारच्या कारवाया केल्या. लोहमार्ग अधीक्षकाचाही त्यांनी उत्तमरितीने कार्यभार सांभाळला.

बलकवडेंचे ‘ड्रीम’ पूर्ण

नागपूर लोहमार्ग अधीक्षक असताना शैलेश बलकवडे यांनी लोहमार्ग पोलिसांच्या कल्याण निधीत वाढ व्हावी, यासाठी अजनीतील मुख्यालयाच्या मैदानात पेट्रोल पंप स्थापन्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंगळवारीच मंजुरी मिळाली. याशिवाय बेलतरोडी येथील सव्वा तीन एकर जागेवर लोहमार्ग पोलिसांना हक्काचे घरे मिळावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. या जागेवर ९०० चौरस फुटाचे दोन बीएचके फ्लॅट कमी दरात पोलिस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण अडीचशे फ्लॅट असलेल्या या संकुलातील १०० फ्लॅट शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या प्रस्तावालाही हिरवा कंदील मिळाला आहे. या निमित्ताने लोहमार्ग अधीक्षक राहिलेले बलकवडे यांचे हे ‘ड्रीम’ लवकरच पूर्णत्वाच्या ‘रुळावर’ धावेल.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *