facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नाशिक / मार्केट फुलले; चेहरे उतरले

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा घेऊन आलेल्या तब्बल तेराशेच्या आसपास ट्रॅक्टर्सने अक्षरशः फुलले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चेहरा काही खुलला नाही. कांद्याची प्रचंड आवक झाल्याचा परिणाम झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत येथे लाल कांदा पुन्हा घसरला. खाली येणाऱ्या कांदा बाजारभावाने पूर्वीपेक्षा सोमवारी प्रतिक्विंटल जवळपास ७५ रुपयांनी ‘झटका’ दिल्याने शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले.

आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी बाजार समितीच्या शहरातील मुख्य बाजार आवारात कांदा घेवून येणारे ट्रॅक्टर्स नजरेत भरत होते. मंगळवारी (दि.१०) आठवडे बाजारामुळे मार्केट बंद राहणार होते. त्यामुळे सोमवारच्या लिलावासाठी येवल्यात कांदा ट्रॅक्टर्सची महागर्दी झाली होती. परिणामी बाजार समितीकडे जाणाऱ्या मनमाड-नगर राज्य महामार्गावर दुतर्फा लांबच लांब ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या होत्या.

सोमवारी येवल्यात तब्बल तेराशेच्या आसपास ट्रॅक्टर्समधून लाल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. त्यातील एकूण ९०० ट्रॅक्टर्समधील कांद्याचे लिलाव दिवसभरात पार पडले. उर्वरित चारशे ट्रॅक्टर्समधील लिलाव मंगळवारच्या सुटीनंतर बुधवारी (दि. ११) मार्केट उघडल्यावरच होणार आहेत.

आजही गर्दी होणार
मकरसंक्रांती निमित्त येणाऱ्या सुट्ट्यांमुळे येवला बाजार समिती बंद राहणार आहे. त्यामुळे बुधवारी येवला बाजार समितीत लिलावासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र कांद्याचे दर कमी होत असल्याने शेतकरी नाराज आहेत.

क्विंटलमागे ७५ रुपयांची घसरण

येवला बाजार समितीत सोमवारी पूर्वीच्या तुलनेत ‘लाल’ कांदा बाजारभावात प्रतिक्विंटल जवळपास ७५ रुपयांनी घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची हिवाळ्यातील ‘लाली’ क्षणार्धात गुल झाली. सोमवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ६५१ (सरासरी ५८०) असा बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी हाच बाजारभाव किमान ३०० ते कमाल ७२५ (सरासरी ६५०) असा होता. कांदा बाजारभावाचा आलेख वर सरकण्याऐवजी खाली येऊ लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली भरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Check Also

आचारसंहिताभंग सानपांना भोवणार?

पंचवटी परिसरात ग्रीन जीमच्या उद््घाटनाच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *