facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, कोल्ड्रींकच्या बाटलीवर मूळ किमतीपेक्षा तब्बल ६६ टक्के अधिक शुल्क आकारण्याचा प्रकार छोट्या नाही तर हल्दिरामसारख्या मोठ्या हॉटेलात घडला आहे. ग्राहक या नात्याने प्रत्येकाची छोट्या-मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे आजवर वारंवार दिसून आले आहे. काहीवेळेस ग्राहक या फसवणुकीचा निषेध करतो. तर काहीवेळेस ग्राहकाला लक्षातच येत नाही. काहीवेळेस मात्र लक्षात येऊनही समोरील विक्रेता ही फसवणूक सर्रास करतो. असाच प्रकार हल्दिराम फूड्सबाबत सुरू आहे. कोल्ड्रींकच्या किमतीवर थेट अतिरिक्त व भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. एका ग्राहकाला अलीकडेच हा अनुभव आला.

या ग्राहकाने अजनी येथील हल्दिराम फूड्सच्या प्लॅनेट फूड या रेस्टॉरेंटमधून काही सामान खरेदी केले. त्यामध्येच १२ रुपये किमतीच्या कोल्ड्रींकची बाटली घेतली. पण, प्रत्यक्ष बिल पे करताना या बाटलीची किंमत चक्क २० रुपये आकारण्यात आली. यामुळे या ग्राहकांना धक्काच बसला. अनेक विक्रेते ‘कुलिंग चार्ज’ च्या नावाखाली अनेकदा दोन रुपये अतिरिक्त घेतात. तेदेखील अनधिकृत असले तरी मान्य करण्याजोगे आहे. पण १२ रुपये छापील किंमत अर्थात एमआरपी असलेल्या बाटलीवर २० रुपये अर्थात ६६ टक्के आकारणे म्हणजे धक्कादायक. यामुळे या ग्राहकाने तेथील व्यवस्थापक मंगेश घारड यांच्याकडे याबाबत विचारणा केली. तर ‘हा केवळ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. तो का घेण्यात आला, माहीत नाही. या बाटलीचे २० रुपयेच द्यावे लागतील,’ असे त्यांनी या ग्राहकाला सांगितले.

या अरेरावीयुक्त भाषेचा या ग्राहकाला आणखीनच धक्का बसला. पण त्याक्षणी ग्राहक या नात्याने ते पूर्णपणे हतबल ठरले आणि फसवणूक जी व्हायची ती झालीच.

■ ‘मालक-संचालकांना माहीत’

अशाप्रकारे ग्राहकांकडून अतिरिक्त पैसा का घेतला जातो? याबाबत ‘मटा’नेदेखील मंगेश घारड यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हा सरकारी नियमाचा भंग आहे, असे विचारले असता ते म्हणाले, ‘याबाबत कंपनीच्या मालक-संचालकांना माहीत. कम्प्युटरमध्ये जी किंमत फीड आहे. त्यानुसार आम्ही बिल आकारतो. बाकी व्यवस्थापनालाच माहीत.’

काय म्हणतो सरकारी नियम?

कुठलीही डबाबंद वस्तू त्यावर छापण्यात आलेल्या किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने विक्री करता येत नाही. अशी विक्री होत असल्यास तो राज्य सरकारच्या वैधमापन शास्त्र अथवा वजन व मापे या विभागाच्या नियमांचा भंग ठरतो. आता हल्दिरामच्या या एका रेस्टॉरेंटमध्ये दिवसाला असे अतिरिक्त आठ रुपये आकारले जात असताना त्यांचे शहरभर रेस्टॉरेंट आहेत. तेथील परिस्थिती विचारात घेता हजारो रुपयांचा हा घोटाळा होतो. पण वैधमापन शास्त्र विभाग याबाबत मूग गिळून आहे. त्यांचाच सरकारी नियम सर्रास पायदळी तुडवला जात असताना ते अनभिज्ञ आहेत.

Check Also

दोन झोनमध्ये अतिक्रमण कारवाई

आवाज न्यूज नेटवर्क –  नागपूर – महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इमारतींच्या अवैध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *