facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / पुणे / व्यवसायाचे आमिष दाखवून फसवणूक

व्यवसायाचे आमिष दाखवून फसवणूक

क्युनेट या वेबसाइटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर सेलने चौघांना अटक केली आहे. या आरोपींनी देशातील दोनशेहून अधिक जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
टिनू रोशनलाल वाधवानी (वय २४, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सिद्धार्थ अरुण हरले (वय ३०, रा. जुनी सांगवी), विजय काशिनाथ भोई (वय २७, रा. मळकर रोड, आळंदी), राहुल प्रवीण पात्रा (वय २५, औरा अपार्टमेंट, बालेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. मयुरी खानवाले, स्वप्नील जाधव आणि विनोद पचराला हे आरोपी अद्याप फरारी आहेत. महेश उत्तम माने (वय २८, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे.

या फसवणूक प्रकरणात मयुरी आणि टिनू हे दोघे मुख्य आरोपी आहेत. व्यवसाय करण्यासाठी सर्वसामान्यांना उद्युक्त करून त्यांना ठरावीक रक्कम भरण्यासाठी ते भाग पाडत होते. त्यानंतर आणखी व्यक्तींना या व्यवसायासाठी भाग पाडल्यानंतर त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या रकमेवर कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात येत असे. आरोपींच्या जाळ्यात फसून कमिशनच्या हव्यासाने शंभरपेक्षा अधिक जणांनी टिनूकडे रक्कम सोपविल्याचे समोर आले आहे. अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने आणि हरले मित्र आहेत. हरलेने माने यांना फोन करून व्यवसायासाठी दोन ते तीन लोकांची गरज असल्याचे सांगितले. आपण मोठा व्यवसाय करीत असून, त्यामध्ये पाच वर्षांत चार कोटी रुपये कमिशनचे मिळाल्याचे थाप त्याने मारली. त्यानंतर हरलेने माने यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन अन्य आरोपींची ओळख करून दिली. व्यवसायासाठी चार लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर पुढील चार वर्षांत पाच कोटी रुपये कमविता येतील, असेही हरले यांना सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने माने यांनी कर्ज काढून चार लाख रुपये भरल्यानंतर त्यांना ‘क्युनेट’ची कल्पना देण्यात आली.

पुण्यात चाळीस लाखांचा गंडा
त्यानंतर माने यांना अन्य सभासदांना या व्यवसायात सहभागी करण्याविषयी बजावले. नव्या सभासदांनी पैसे भरल्यानंतर ठरावीक रक्कम कमिशनच्या नावाखाली अन्य आरोपींच्या खात्यात भरण्यात आली. त्यानंतर माने यांना आरोपींनी परिषदेच्या नावाखाली युरोपची सैर करविली. त्याचा खर्च आगाऊ भरलेल्या रकमेतून केल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर माने यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाधवानींकडे पैसे परत मागितले. पैसे परत करता येत नसल्याचे उत्तर मिळाल्यावर अखेर माने यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या आरोपींनी पुण्यात दहा जणांची चाळीस लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *