facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / अहमदनगर / मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर या देशात आयएसची पुनरावृत्ती अटळ आहे. हिंदूराष्ट्राचे संकट देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने घोंगावत आहे. देशात आज मोदी अथवा भाजपची सत्ता नसून ती संघाची आहे. सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी संघापासून बदलले असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मोदी संघाचे कट्टर प्रचारक असून लबाडीपणा करत आहेत,’ अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली. ‘सर्वधर्म समभाव व विकासाचा पुरोगामी विचार जपणार्‍या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. आण्णासाहेब शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या विकासासाठी समर्पित केले,’ असे त्यांनी या वेळी सांगितले.

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी धवल क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात भाई वैद्य बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, बाजीराव खेमनर, पंडिततात्या थोरात, दुर्गा तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, शरयू देशमुख, शिवाजीराव थोरात, हरिभाऊ वर्पे, अरुण कडू, बाळासाहेब गुंजाळ, लक्ष्मण कुटे, रामदास वाघ, डॉ. राजीव शिंदे, दिलीपराव शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व रोख एक लाख एक हजार रुपये साहि्त्यिक डॉ. सदानंद मोरे यांना व डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व रोख एक लाख एक हजार रुपये कृषितज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी यांना तसेच सहकारातील योगदानाबद्दलचा जिल्हास्तरीय पुरस्कार (स्मृतिचिन्ह व रोख एकावन्न हजार रुपये) माजी खासदार दादा पाटील शेळके यांना प्रदान करण्यात आला.

भाई वैद्य म्हणाले, ‘भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे यांनी समतेच्या विचारातून समाजासाठी सातत्याने काम केले. कायम भांडवलशाही व आर्थिक वादाला विरोध केला. सध्या भारतात हा धोका वाढतोय. समाजाची बांधणी ही त्यागातून होते, मागील पिढ्यांनी समाजाच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घातले, तेव्हा ही माणसे इतकी मोठी झाली. संगमनेर हा सहकार आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराचा संगम आहे. सहकार हा भांडवलशाहीला मोठा पर्याय असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शिक्षण व ग्रामीण विकास साधला आहे. हे कार्य सर्वांनी पुढे न्यावे.’

उल्हास पवार म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्याचे राज्यात वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. राज्याला व देशाला नेतृत्व देणारी माणसे इथे घडली. वैचारिक विधायक संघर्ष झाला; मात्र, सुसंवाद त्यातून घडला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातून भाऊसाहेब थोरातांसारख्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास घडविला. हाच समृद्ध वारसा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालविला आहे.’

डॉ. सदानंद मोरे यांनी ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाच्या पुरस्काराने आपल्याला यापुढे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे,’ असे सांगितले. डॉ. मायी यांनी, ‘माझे आदर्श असणार्‍या डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने यापुढे आणखी संशोधनासाठी स्फूर्ती मिळाली आहे,’ असे सांगितले. माजी खासदार दादा पाटील शेळके म्हणाले, ‘मी कायम साधे आयुष्य जगलो आहे. खोटे व चुकीचे काम कधीही केले नाही. हा पुरस्कार म्हणजे आपल्या प्रामाणिक कामाचा पुरस्कार आहे.’

आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे यांनी आभार मानले.

कोट ः

भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे आजच्या येथील पिढीचे आदर्श आहेत. या जिल्ह्याने देश आणि राज्याचे नेतृत्व करतील, अशी माणसं निर्माण केली. वैचारिक संघर्ष येथे अनेकदा झाले. आज मात्र हे चित्र बदलत चालले आहे.

– उल्हास पवार, माजी आमदार

Check Also

साखर आयातीची घाई करू नये

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *