facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / मोर्चाची तारीख पुढे ढकला

मोर्चाची तारीख पुढे ढकला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा मुंबई क्रांती मोर्चाची तारीख पुढे ढकलावी, असा ठराव राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथे १५ मार्च रोजी मोर्चाच्या आयोजनासंदर्भात होणाऱ्या बैठकीत कोल्हापुरातील ठरावाची माहिती देण्यात येणार आहे. उपमहापौर अर्जुन माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

बैठकीच्या प्रारंभी वसंतराव मुळीक यांनी मोर्चासंबधी माहिती दिली. राज्यात, देशात व परदेशात मराठा समाजाने ५७ मोर्चे शांततेत काढले आहेत. तीन कोटी मराठा बांधव रस्त्यांवर उतरले होते. मराठा क्रांती मोर्चाद्वारे केलेल्या मागणीची पुर्तता राज्य सरकारने सुरु केली आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे मुंबईत पुर्ण ताकदीने मोर्चा काढावा, अशी सूचना केली. महानगरपालिका पक्षप्रतोद प्रवीण केसरकर म्हणाले, ‘कोल्हापुरातील मराठा मोर्चाला मुस्ल‌िम धर्मियांसह सर्व जाती धर्मांनी पाठिंबा दिला होता. मुंबईतील मोर्चासाठी आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण मदत केली जाईल, असे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

हर्षल सुर्वे म्हणाले, ‘मराठा मोर्चाचा यशस्वी होऊ नये म्हणून काही मंडळी फितूर होऊन सरकारचे समर्थन करत असल्याने त्यांच्यापासून सावध रहावे. गडकोट संवर्धनाचा प्रश्न मराठा मोर्चाच्या अजेंड्यावर अग्रक्रमाने घेण्यात यावा. मुंबईत फक्त एकच दिवस मोर्चा न काढता प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत चार ते पाच दिवस मुंबईत ठिय्या मांडावा,’ अशी सूचना केली.

उद्योगपती चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘मुंबई ही देशाची राजधानी असल्याने या ठिकाणचा मोर्चा हा विराट निघाला पाहिजे. मोर्चाच्या नियोजनासाठी १५ दिवस कमी पडणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे मोर्चाची तारीख पुढे ढकलावी. मुंबईत अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढून विधानभवनाच्या दारात तीन ते चार दिवस ठिय्या मारण्याचे नियोजन केले पाहिजे. मराठा समाजाची उद्रेकांची जाणीव देशालाच नव्हे तर जगाला कळायला हवी.’

दिलीप देसाई म्हणाले, ‘३१ तारखेच्या मोर्चा काढला तर मुख्यमंत्री आचारसंहितेचे कारण सांगून कोणतीही घोषणा करणार नाहीत. मुंबईतील विराट मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, शहरातील तालमी, संस्था यांची पुन्हा बैठक घेण्याची सूचना केली.

मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर गेली २० वर्षे सरकारी दरबारी व कोर्टात लढा सुरू आहे. मुंबईतील मोर्चा आयोजित करण्याबरोबर मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, अॅट्रासिटी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांची फळी तयार केली पाहिजे. मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने सुरु आहेत. ‘जाळून टाका, पेटवून टाका’ या मार्गानी प्रश्न सुटत नाहीत. आंदोलनाद्वारे आपण सरकार बदलू शकतो. पण प्रश्न सुटू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात मराठा समाजाच्या संघटनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, शिवाजी खोत, दीपा पाटील, वैशाली महाडिक, संदीप पाटील, राजू लिंग्रस आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शिरोळमधील दिग्गज भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने, काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव, कोल्हापूर जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *