facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / युतीच्या जागावाटपात ९० ते ९५ जागांवर समाधान मानण्याची शक्यता

युतीच्या जागावाटपात ९० ते ९५ जागांवर समाधान मानण्याची शक्यता

मागील वर्षभरापासून मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपने युती करण्याची तयारी दर्शवून स्वबळाचे एक पाऊल मागे घेतले आहे. याच धर्तीवर युतीच्या जागावाटपात भाजप ९० ते ९५ जागा घेऊन समाधान मानणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

अडीच वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेत शत प्रतीशत भाजपचा नारा दिला आहे.

पालिकेत शिवसेना मोठा भाऊ असल्याने भाजपला दुय्यम वागणूक देते, तर राज्यात भाजप मोठा भाऊ असल्याने सेनेला दुय्यम वागणूक मिळते. पालिकेतील वागणुकीची परतफेड करून सेनेशी काडीमोड घेऊन राज्य सरकार चालवणे शक्य असल्याचा इशारा देण्यासाठी मुंबई पालिकेची निवडणुकीत स्वतंत्र लढवण्याचे मनसुबे भाजपने आखले होते. मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार व खासदार किरीट सोमैया यांनी त्यादृष्टीने सेनेच्या विरोधात टीकेची धार कायम ठेवली होती.

पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मात्र भाजपने युतीसाठी तयार असल्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर सेनेने कमीत कमी जागा देऊन भाजपला आपल्यामागे फरफटत आणण्याची रणनीती आखली आहे. एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता स्वबळावर लढण्याची असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे युतीसाठी अनुकूल असल्याने अॅड. शेलार व सोमैया बॅकफुटवर गेले आहेत.
या निवडणुकीत भाजपला ८० जागा देण्यास शिवसेना तयार असल्याचे सांगितले जाते, तर भाजप ११० जागांवर अडून बसली आहे. जागावाटपाच्या शेवटच्या टप्प्यात सेना ९० ते ९५ जागा देण्यास तयार होणार असल्याची माहिती सेनेतील सूत्रांनी दिली. मात्र भाजप १०० जागांवर अडून बसणार असल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सन २०१२च्या पालिका निवडणुकीत युती असताना भाजपने ६३ जागा लढवल्या व २९ जागांवर विजय मिळवला होता. तर सेनेने १३५ जागा लढवून ७५ जागा मिळवल्या होत्या. आरपीआयने २९ जागा लढवून एका जागेवर विजय झाला होता. या निवडणुकीत आरपीआय भाजपसोबत आहे. त्यामुळे सेनेकडून १०० जागा घेऊन त्यातील २० आरपीआयला देण्याचा भाजपचा विचार आहे. जागावाटपाच्या या गणितात सेनेला ८० ते ८५ जागांवर विजय मिळवण्याची खात्री वाटते, तर भाजप ५० जागांपर्यंत मजल मारेल, असा दोन्ही पक्षांचा अंदाज आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *