facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / अहमदनगर / भगवानगडाला खेटला, तो संपला

भगवानगडाला खेटला, तो संपला

भगवानगडाला ज्यांनी खेटण्याचा प्रयत्न केला ते सर्व संपुष्टात आले. गडावर येणाऱ्या अनेक गावातील भाकऱ्या बंद करण्याचा कोणी उद्योग केला तरीही गडावरील अन्नदान बंद होणार नाही, अशी टीका गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख न करता केली. या निमित्ताने मध्यंतरी थंडावलेला मुंडे नामदेवशास्त्री वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.

श्री क्षेत्र भगवानगड येथे शुक्रवारी भगवानबाबांचा पुण्यातिथी सोहळा पार पडला. या वेळी जमलेल्या हजारो भाविकांच्या समोर नामदेवशास्त्री बोलत होते. या वेळी शिरुर संस्थानचे मठाधिपती विवेकानंद शास्त्री उपस्थित होते. गेल्यावर्षी गडावर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्यावरुन मुंडे व नामदेवशास्त्री यांच्यातील वाद चिघळला होता. यानंतर गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याची वेळ मुंडे यांच्यावर आली. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी नामदेवशास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली होती. शुक्रवारी झालेल्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने मोजक्याच शब्दात नामदेवशास्त्री यांनी या टीकेचा समाचार घेतला. नामदेवशास्त्री म्हणाले की, आमच्या शिवाय गड चालणार नाही, असा काहींचा समज होता. त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. गड सांभाळण्याचे काम सर्वसामान्य माणसांनी केले असून गडावर अन्नदान करण्यासाठी अनेक गावातुन भाकरी येतात. मात्र, त्या बंद करण्यासाठी काही जणांनी उद्योग केले. मात्र, या भाकऱ्या बंद झाल्या नाहीत. गडावरील अन्नदानाचे काम येथून पुढेही चालूच राहील. प्रत्येकजण स्वत:ला खूप मोठा व बुद्धीवान समजतो. जेंव्हा मोठा माणूस तुम्हाला स्वीकारतो तेव्हाच तुम्ही भाग्यवान ठरता. प्रत्येकाच्या जीवनात संताचे स्थान हे अनन्य साधारण असते. संसारात जे बुरसटलेले विचार असतात, त्या घाणेरड्या विचारांपासून दूर नेण्यासाठी संतांचीच आवश्यकता असते. ज्या संतामुळे तुमचे आयुष्य सुगंधी होते, त्या संताना त्रास देणारी मंडळी समाजामध्ये आहेत. आता गडाचा १४ वर्षांचा वनवास संपला आहे. गडाला कोणी सरकारी मदत देऊ नका. मात्र, गडाची शांतता तरी हिरावून घेऊ नका.

ते म्हणाले की, भगवानबाबांचे लोणी हे गाव आजोळ होते. त्या गावाने गडावर येणाऱ्या भाकऱ्या बंद करत आपली वेगळी मानसिकता दाखवली आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कधीही प्रेमाचे नाते हे मोठे असते. आळंदी ज्ञानेश्वरामुळे तर देहु तुकोबांमुळे जसे ओळखले जाते, तसाच भगवानगड हा भगवानबाबांमुळे ओळखला जातो. या ठिकाणी आज मोठी गर्दी जमली मात्र व्यासपीठावर येण्यासाठी कोणाचीही घाई गर्दी नाही. या ठिकाणी जमलेल्या गर्दीचे भांडवल येथून पूढे कोणीही करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. येत्या गुडीपाडव्याला पंढरपूर येथे धर्मशाळेचे उदघाटन होणार असून त्या वेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यास एकही राजकीय नेता उपस्थित नव्हता.

Check Also

साखर आयातीची घाई करू नये

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *