facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नागपूर / मराठा मोर्चांविरुद्ध संघाचे कारस्थान

मराठा मोर्चांविरुद्ध संघाचे कारस्थान

‘दलितांना चिथावून त्यांना मराठा मोर्चाविरुद्ध मोर्चेबांधणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ षडयंत्र रचत आहे. काही दलित नेते आणि कार्यकर्त्यांना भेटून संघ परिवारातील काही पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्तावसुद्धा दिला होता. त्यासाठी संघातर्फे दलित आणि बहुजनांच्या मोर्चांना आर्थिक रसद पुरविण्याचे आमिषसुद्धा दिले गेले होते’, असा खळबळजनक आरोप बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी केला. नागपुरात शनिवारी काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.

शनिवारी रेशीमबाग मैदान ते संविधान चौक या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भन्ते सुरेई ससाई, प्रा. रमेश पिसे, अॅड. राजकुमार थोरात, देवेंद्र घरडे, नरेश पाटील, अमोल वाकूडकर, अझीमुद्दीन पठाण, रेव्हरंट व्ही. एन. गायकवाड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यभरात हा मोर्चा काढण्यात येत असून, नागपुरातील हा सोळावा मोर्चा होता.

यावेळी वामन मेश्राम म्हणाले, ‘हा मोर्चा कुणा जातीच्या विरोधात नाही. परंतु अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक व्हावा, अशी आमची मागणी आहे. बहुजन समाजाने आजवर वेगवेगळ्या छत्राखाली विविध मोर्चे काढले. परंतु, हा समाज तेव्हाही रस्त्यावरच होता आणि आजही रस्त्यावरच आहे. त्यामुळेच आता सगळ्यांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. यात आम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवांनासुद्धा सोबत घेतले आहे. एकूण ४६७ संघटना या मोर्चाकरिता एकत्रित आलेल्या आहेत.’

ओबीसी मंत्रालय हा देखावा!

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापित करून बहुजनांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, केवळ महापालिकेच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठे‍वून हा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्रालयाद्वारे ओबीसींचे काहीच भले होणार नाही. याउलट फडणवीस यांनी हे मंत्रालय वेगळे करून बहुजनांना विभाजित करण्याचा घाट घातला आहे. फडणवीस आणि संघच मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवून त्यात आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. दुर्दैवाने, मराठ्यांना त्यांचे हे राजकारण कळत नाही’, असे मेश्राम म्हणाले.

अॅट्रॉसिटीला धक्का लावून दाखवा!
‘अॅट्रॉसिटी कायद्याच्या समीक्षेकरिता मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे. परंतु हा कायदा रद्द करणे तर दूरच, यातील एका शब्दालासुद्धा धक्का लावला तर भाजप सरकारला त्याची मोठी किमत अदा करावी लागेल. केंद्राच्या अहवालाप्रमाणे राज्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढलेली आहे. यावरून राज्यातील परिस्थिती दिसून येते. परंतु, इथून पुढे बहुजन समाज आपल्यावरील अन्यायाविरुद्ध कारवाई करण्याकरिता पोलिसांची वाट बघणार नाही. आम्ही स्वतःच अशी प्रकरणे निपटून घेऊ,’ असा इशारा बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी बहुजन क्रांती मोर्चावेळी दिला.

एकच पर्व, बहुजन सर्व
या मोर्चापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्रांतिकारी गीते सादर करण्यात आली. यात ‘तुम्ही पेटून सारे उठा, दिल्लीचा खजिना लुटा’, ‘इथं कुणीच परका नाही’ अशा गीतांचा समावेश होता. तसेच ‘एकच पर्व बहुजन सर्व’ अशा घोषणांनी रेशीमबाग मैदानाचा परिसर दुमदुमला होता.

प्रमुख मागण्या

ओबीसी, एस.बी.सी. भटक्या विमुक्त जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे.

अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक व्हावा. अंमलबजावणीकरिता स्वतंत्र यंत्रणा आणि न्यायव्यवस्था द्यावी.

समान नागरी कायदा मंजूर नाही.

कोपर्डीसारख्या घटनांमधील अपराध्यांना फाशीच व्हावी.

ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे.

Check Also

दोन झोनमध्ये अतिक्रमण कारवाई

आवाज न्यूज नेटवर्क –  नागपूर – महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इमारतींच्या अवैध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *