facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / महाडिकांना भाजपचे निमंत्रण

महाडिकांना भाजपचे निमंत्रण

‘तीळगूळ घ्या, भाजपमध्ये लवकर,’ या असे म्हणत संक्रांतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक पक्षात नसले तरी ते पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांच्या शिरोलीतील निवासस्थानी जाऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच आमंत्रणही दिले. दरम्यान, काँग्रेसमधील मतभेद मिटवण्यासाठी रविवारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांची बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकीत महाडिक यांनी भाजपला मदत केल्याने काही ठिकाणी कमळ फुलण्यास मदत झाली. ताराराणी आघाडी सध्या भाजपसोबत आहे. या आघाडीला महाडिक यांची ताकद आहे. त्याचे नेतृत्व त्यांचे चिरंजीव स्वरूप महाडिक करत आहेत. या पार्श्वभूमीवर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री पाटील यांनी महाडिक यांचे निवासस्थान गाठले. त्यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. महाडिक यांचा सल्ला घेत अनेकांनी भाजप प्रवेश सुरू केला आहे. त्यात गोकुळचे संचालक रणजित पाटील व प्रविण पाटील यांचा समावेश आहे. या प्रवेशाबरोबरच अनेकांच्या भाजप प्रवेशाबाबत या दोन्ही नेत्यांची बराच वेळ चर्चा झाली.

जिल्ह्यात कुठे कुणाशी आघाडी करायची याबाबत चर्चा करतानाच जागावाटपाबत काही पर्याय सुचवण्यात आले. शिवसेना, स्वाभिमानी हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर रहावेत यासाठी महाडिक यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती पाटील यांनी केली. स्वाभिमानीने काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ​जागेवर युतीची भूमिका घेतली आहे. यामुळे या पक्षाचे खासदार राजू शेट्टी व जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्याशी रविवारी मंत्री पाटील चर्चा करणार आहेत.

धैर्यशील माने भाजपमध्ये ?

जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या मंगळवारी माने गटाचा मेळावा बोलवण्यात आला आहे. यावेळी धैर्यशील माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांनी शह देण्यासाठी भाजपतर्फे ही खेळी सुरू असल्याचे समजते.

काँग्रेस कमिटीत आज बैठक

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यातील दुरावा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची अजून एकही बैठक झाली नाही. या दुराव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे. यामुळे मतभेद मिटवून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रविवारी या दोन्ही नेत्यांची काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक होणार आहे. यावेळी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

शिरोळमधील दिग्गज भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने, काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव, कोल्हापूर जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *